याआधीचे भाग -
माझ्या इतिहासप्रेमाचं मूळ - १ माझ्या इतिहासप्रेमाचं मूळ - २
***
पुण्यातल्या रस्त्यारस्त्यावर इतिहास वसतो आहे, नववी-दहावीच्या सुमारास माझी सायकल भटकंती सुरु झाली, या सायकल भटकंतीमध्ये पुण्यातल्या गल्लीबोळातून फिरताना मी पुण्याच्या आणि इतिहासाच्या प्रेमातच पडलो.
किती खुणा असाव्यात या शहरात..
पेशव्यांचा शनिवारवाडा, त्याच्या समोर थोरल्या बाजीरावांचा भव्य पुतळा
थोडं पुढं आलं की, महाराजांचा लाल महाल, त्यात तो बाल शिवाजी आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा (आता तो पुतळा तिथे नाही, राजकारण्याची अवकृपा)
शेजारीच मासाहेबानी जिर्णोधार केलेला कसबा गणपती..
तिथून स्टेशनच्या बाजूला निघाला की एका बसथांब्याचं नाव आहे १५ ऑगस्ट लॉज (मला नावामागचा इतिहास माहित नाही) ..
नगररोड ला गेलो तर इंग्रजांनी बांधलेला बंड - बंडगार्डन
थोडं पुढे गांधीजीनी वास्त्यव केलेलं आगाखान Palace -
शहराच्या बाहेर पडलं तर भीमा कोरेगाव - मराठे आणि ब्रिटीश यांचं युद्ध
जिथे संभाजी महाराजांनी बलिदान दिलं ते वढू बुद्रुक ..
परत शहरात येताना विमानतळाकडे वळलो तर येरवड्याचा तुरुंग - इथे गांधी आणि आंबेडकर यांच्या मध्ये झालेला पुणे करार..
तसेच शहराच्या बाहेर पडलो तर सरळ संतांच्या दारात - श्री क्षेत्र आळंदी -
आळंदीवरून परत येताना बॉम्बे Sappers कडे वळलो तर होळकर पूल...अहिल्यादेवी होळकर ज्यांनी पती निधनानंतर सुद्धा इंदोरचं मराठी राज्य टिकवलं..वाढवलं..
मग खडकी ..पुन्हा एकदा मराठे आणि ब्रिटीश यांचं युद्ध ..
मग अभियांत्रिकी विद्यालयाच्या शेजारचं राज्य गुप्तवार्ता विभागाचं (म्हणजे सी. आय. डी) कार्यालय.. त्यातली चाफेकरांना ठेवलं होत ती कोठडी..
तिथून परत सिमला ऑफिसच्या चौकाकडे गेल्यावर वीर चाफेकर चौक (ज्याला आपण सध्या शेतकी महाविद्यालय चौक म्हणतो)
विद्यापीठाकडे गेलो तर सेनापती बापट मार्ग..
तो पार केला तर बी. एम. सी. सी. ची ती मागची बाजू जिथे टिळकांनी आणि आगरकरांनी देशसेवेची शपथ घेतली..
सरळ डेक्कन कडे निघालो तर.. संभाजी महाराजांचा पुतळा ...
कोथरूड कडे वळलो तर सिंहगडावर ऐंशी वर्षाचे असून पण दोर कापून मावळ्यांना परत लढायला लावणाऱ्या शेलार मामांचा चौक ..
त्याचा समोर जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतातली पहिली विदेशी कपड्यांची होळी पेटवली ती नदी काठची जागा ...
आणि हे सर्व आहे महिला कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या धोंडो केशव कर्वे पथावर..
पूना हॉस्पिटल कडे वळलो तर.. लाल बहादूर शास्त्री मार्ग ..रामकृष्ण मिशनचा मठ आणि समोर पर्वती ....
उजवीकडे वळलो तर सरळ सिंहगड..
डावीकडे वळलो तर सारस बागेच्या चौकात उजव्या हाताला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक ..
डावीकडे वळून सरळ गेलो तर एका बाजूला टिळक रोड आणि दुसरी कडे थोरले बाजीराव रोड....
टिळक रोडला निघालो तर पानिपतावर आत्मार्पण करणाऱ्या सदाशिवरावभाऊंची सदाशिव पेठ
बाजीराव रोडला गेलो तर सार्वजनिक काका चौक..
पुढे विश्रामबाग वाडा..
आणि मग परत शनिवारवाडा..
तिकडून जुन्या बाजाराकडे गेलो तर औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून आणणाऱ्या संताजी घोरपडेंचा पथ...
हडपसरच्या बाजूला गेलो तर.. गोळीबार मैदान..शिंद्याची छत्री..
किती लिहू....अजून कित्येक जागा बाकी आहेत.. हि यादी न संपणारी आहे
पुणं हे असं शहर आहे जिथे पावलोपावली इतिहास घडला आहे ..आणि अशा पुण्यात जन्मलेला आणि वाढलेला मी इतिहासाच्या प्रेमात पडणं स्वाभाविकच आहे!!
excellent!! kharay!
ReplyDeleteकणाद, या सर्व जागा तुला जाणवल्या असतीलच याची मला खात्री आहे ..:)
Delete