Wednesday, February 29, 2012

माझ्या इतिहासप्रेमाचं मूळ - २


शिवजयंतीचा उत्सव हा माझ्या घराच्या परिसरात नेहमीच जोरात साजरा व्हायचा. त्यामुळे अगदी जन्मापासून म्हणालं तरी चालेल, पुरंदरेंची भाषणं मी ऐकली आहेत. (दुर्दैवाने सध्याच्या सोसायटीत असं काही होत नाही, बंद दरवाजा संस्कृती असल्याने पुढं ही होईल अशी शक्यता दिसत नाही.) 

शाळेतल्या पुस्तकात महाराज पहिल्यांदा चौथीला आले. मुखपृष्ठावरचं त्याचं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. निळ्या पार्श्वभूमीत महाराज पांढऱ्या घोड्यावर बसलेत आणि त्यांच्या मागे काही सहकारी. या पुस्तकाची मी अगणित पारायण केली होती. तेव्हापासून महाराज जे मनात वसले ते आजतागायत.

नंतर सातवी-आठवीला जेव्हा बाजीप्रभूंचा पावनखिंड आला, तोपर्यंत तर महाराज माझे दैवत झाले होते.. त्यांचा सर्व जीवनपट मुखोद्गत झाला होता..

***
आम्ही सगळे गणपती बघायला गेलो होतो. हत्ती गणपती बघून लकडी पूल पार करून डेक्कन कॉर्नरला आल्यावर माझे लक्ष रस्त्यावर बसलेल्या पुस्तकवाल्याकडे गेलं. जिथे पाच मिनिटापूर्वी मी तलवार घ्यायची का बंदुक यासाठी रडलो होतो, इथे तोच मी त्या पुस्तकवाल्याकडे थांबलो होतो. तेव्हा मी तलवार घेतली का बंदूक हे मला बिलकुल आठवत नाही, पण त्या  पुस्तकवाल्याकडून घेतलेलं सावरकरांचं अल्पचरित्र मात्र आठवतं. त्यातली सावरकरांची ती प्रतिज्ञा "मारिता मारिता मरेन", मार्सेलसच्या समुद्रातली ती उडी .... या सगळ्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला.

***

अशा बऱ्याच गोष्टी आहेत -  
ऑगस्ट, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला शाळेत केलेलं भाषण,  
एम. सी. सी. मध्ये  म्हणलेलं कदम कदम बढाये जा हे सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचं गीत
दहावीला असलेला डॉ. आंबेडकरांचा उन्नतीचा मूलमंत्र धडा .. 
अशा सर्वांचा एकत्रित प्रभाव माझं इतिहास प्रेम उत्तरोत्तर वाढण्यात झाला

No comments:

Post a Comment