आणि मला गांधी दिसले !
इतिहासचं मला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. पण त्याची सुरुवात कुठून झाली याचं नेमकं उत्तर देता येत नाही, बहुधा आई बाबांकडून वारसाहक्कानी मिळालेली ठेव आहे ही..
पण अगदीच स्मरणशक्तीला जोर देऊन सुरुवात कशी झाली हे शोधायचं झाल्यास ती बहुधा दुसरीमध्ये. तेव्हा मला प्रत्यक्ष गांधीजी दिसायचे. हे लगे रहो वैगेरे खूप नंतर आलं, त्याच्या खूप आधी. तेव्हा नुकतीच अक्षरओळख झाली होती, आणि मला दिसेल ते वाचत सुटण्याची सवय लागली होती. दुकानावरच्या, बसवरच्या पाट्या, रस्त्यांनी लावलेल्या जाहिराती, दुधाच्या पिशवीवरची छापील माहिती असं काहीही. थोडक्यात जे दिसेल ते म्हणा ना.
आणि अशात शाळेच्या पुस्तकात गांधींवरचा एक धडा आला. दुसरीचं पुस्तक ते त्यात असं कितीसा धडा असणार - अगदीच छोटा - गांधीजी दक्षिण आफ्रिकेतल्या रेल्वेतून प्रवास करत होते. तिथल्या तिकीट तपासनिसानी त्यांना ते काळे आहेत म्हणून धक्के मारून खाली उतरवलं आणि त्याचं सामान खाली फेकलं. शेजारी उजव्या बाजूला एक चित्र होतं - सुटाबुटातले, डोक्यावर केस आणि मिशी असलेले गांधीजी अस्ताव्यस्त सामानाच्या मध्ये फलाटावर उभे आहेत. या घटनेनंतर मग गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत चळवळ उभारली आणि काळ्या भारतीयांना वागणुकीविरुद्ध लढा उभारला, असा तो धडा.
माझ्या बाळबोध बुद्धीला हा काळा-गोरा भेद काही उमजला नाही. एकतर मी स्वत:ला गोरा समजत होतो. माझ्या आताच्या दिसण्यावर जाऊ नका, तेव्हा मी बरा होतो!! मग भारतीय काळे कसे, हे काही मला कळण्यासारखं नव्हतं.
त्यातच त्या काळी टीव्हीला गांधींची सिरीयल लागायची, रविवारी सकाळी साडेआठला - आणि ते गाणं "भारत भारत हम इसकी संतान". दिवसातून दहा वेळा लावल्याशिवाय दूरदर्शनवाल्यांना पगार मिळत नव्हता बहुतेक. त्या गाण्यात गांधीजींचा एक पुतळा दाखवायचे, काळा, पूर्ण दगडी, हातात काठी, थोडे पुढे झुकलेले, पूर्ण टक्कल, तो गोल चष्मा - आणि हाच पुतळा मला दिसू लागला आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीत !
माझं एकट स्वयंपाकघरात जाण बंद झालं. पाणी जरी हवं असेल तरी, "आई पाणी दे, आत मध्ये गांधीजी आहेत" - मी शेजाऱ्यापाजाऱ्यामध्ये चेष्टाचा विषय बनलो, असं बरेच दिवस चाललं. आई म्हणायची "ज्या गांधीनी जिवंतपणी कुणावर हात उगारला नाही, ते तुला काय काठीनी मारणार आहेत? मागच्या जन्मी तू नथुराम गोडसे असशील, त्यांना मारलं म्हणून तुला आता ते दिसतात!!"
ही माझी भीती बरेच दिवस टिकली, अर्थात ते मुन्नाभाई सारखे माझ्याशी कधी बोलले वैगेरे नाही, पण ती खिडकी, तो काळा पुतळा, ती काठी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे....
No comments:
Post a Comment