Monday, October 10, 2011

पानिपत

पानिपत... मराठी मनाचा दुखरा कोपरा.. हृदयावर झालेली एक खोल जखम.. अडीचशे वर्ष झाली तरी भळभळून वाहणारी जखम.... १४ जानेवारी १७६१, भारतवर्ष सुखाची संक्रांत साजरी करत असताना भारताच्या रक्षणासाठी महाराष्ट्राची एक अख्खी पिढी लढली... साक्षात मृत्यूशी........लढली आणि अमर झाली...

पानिपतचं युद्ध.... राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण यांचा मांडलेला यज्ञ आणि त्यात प्राणांची आहुती देणारे मराठी वीर...

अनाकलनीय गुंता, कोण विजेता, कोण पराभूत.... ..रुढार्थाने  पाहिले तर मराठ्यांचा पराभव.. दारूण पराभव.. ..पण इतिहासाच्या अभ्यासात एक लढाई आणि त्याचा निकाल एवढेच पाह्यचे नसतात.. युद्धानंतर विजेत्या अब्दालीची परत भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मतच झाली नाही... आणि दहा वर्षातच  पेशवे परत सार्वभौम झाले... पण एक पिढी गमावल्याच दुख एवढे जास्त आहे कि आजही पानिपतवर महाराष्ट्रभर चर्चासत्रे होत असतात...

विश्वास पाटलांच पानिपत मी आतापर्यंत किती वेळा वाचले मलाही माहित नाही, आठवी नववीत पहिल्यांदा वाचल्यानंतर मी त्याची असंख्य पारायणे केली आहेत... बहुधा त्यामुळेच जेव्हा मी शनिवारवाड्या समोरून जातो, तेव्हा  माझा भारतीय असण्याचा, महाराष्ट्राबद्द्लाचा,  पुण्याबद्द्लाचा अभिमान उफाळून येतो...  ( मी प्रांतीयतावादाला  मुळीच थारा देत नाहीये... भारतीयत्व प्रथम, नंतर मराठीपणा)

खाली पुस्तकातली  सदाशिवरावभाऊंच्या  मुखातली काही वाक्य आहेत... दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर भाऊंनी मृत्यूशी जो जंग आरंभला होता त्याचे अत्यंत समर्पक वर्णन त्यात आहे..

मृत्यूचं दर्शन मला अनेकदा घडलं आहे, नदीपल्याडच्या नगरात राहणाऱ्या आणि अधेमधे पाणवठ्यावर भेटणाऱ्या सवंगड्यासारखा तो मला अनेकदा  भेटला आहे, आणि रणांगणावरच  मृत्यू भेटला तर विजेच्या गोळ्याला गिळणाऱ्या धरतीसारखा मीही त्याला कवेत घेईन आणि भस्म होईन... (पृष्ठ क्रमांक ९९)

पानिपतची आमची ही मोहीम काही औरच आहे. मराठी मातीच्या सर्वोच्च सद्गुणांचा आणि दुर्देवी दुर्गुणांचा हा सुंदर मिलाफ आहे. उपासापोटी आमची पथके ह्या जागी हिमतीने खडी आहेत. काळासारख्या वैऱ्याने पुरता पेच टाकला आहे, पण आपापसातल्या लाथाळ्या, कुरबुरी, भाऊबंदकी तरी मिटलेली  दिसते का? आमच्या मराठी मातीची महती न्यारीच. यातले खडे  बाजूला केले तर ह्या मातीतून भव्य चिरेबंदी  यशोमंदिर  उभे राहू शकते, पण मातीत मिसळलेले खडे काही वखताला इतके प्रबळ असतात कि ते साऱ्यांचीच माती करून टाकतात. (पृष्ठ क्रमांक ४२१)

मीही एक क्षुल्लक प्राणी!! न राजा, ना कुठल्या दौलतीचा धनी! पण तुमच्यासारखाच इमानाचा, जिद्दीचा वसा घेऊन ह्या इथे गाडून उभा राहिलो आहे. इकडे टाका घालावा, तर तिकडे उसवते! सारे विश्वच फिरले आहे. तरीही आम्हाला उमेद, जिद्द तुमच्यासारख्याच मर्दांच्या संगतीने आणि शूरांच्या पंगतीने लाभली आहे. (पृष्ठ क्रमांक ४५१)

आपल्या देहाची उंची ती कोण? फार फार तर दोन-तीन गज, पण ध्येयाची उंची मोजायला हजारो गज पुरायचे नाहीत.  (पृष्ठ क्रमांक ४८०)

अशी असंख्य वाक्यं आणि तो संग्राम...   भारताचा (म्हणजेच महाराष्ट्राचा) परचक्रा विरुद्धचा  संघर्ष अनुभवायचा असेल... तर पानिपत नक्कीच वाचा...

No comments:

Post a Comment