Wednesday, April 25, 2012

अमृतवेल: वि. स. खांडेकर

खांडेकरांची हि कादंबरी मागच्या पिढीनी वाचली, आणि आता मी वाचतोय.. खाली दिलेला पहिला परिच्छेद तेव्हा पासून आतापर्यंत माझ्या आई-बाबांच्या लक्षात होता. मी सहज म्हणून कणादच्या घरी हा विषय काढला तर आश्चर्य म्हणजे त्याच्या हि घरी काका-काकूंना तो आठवत होता...!!
अशा प्रसिद्ध कादंबरीतले हे काही उतारे -
****

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
****

माणसाचं मन हि अजब सर्कस आहे! माकडचेष्टा करून हसविणारा विदुषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्युगोलात बेफामपणे मोटार-सायकल चालविणारा तरुण आणि वाघ-सिंहासारखे हिंस्त्र पशु या सर्वांचे संमेलन आहे ते! वाघ-सिंहाशिवाय सर्कस नाही - उद्दाम वासानंशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत कडकड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ-सिंहावर हुकुमत गाजवितो, मात्र हे प्राणी  माणसाळल्यासारखे वाटले, तरी त्यांच्याला हिंस्त्र पशु केव्हा जागा होईल, याचा नेम नसतो!

****

माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटत; नवे निर्माण होतात; पण या नव्या-जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाचा अर्थ येतो, तो त्या सतत गुंफणीतल्या कलेमुळे - गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे!

****
देवालयाचे सौदंर्य पाहून डोळे शिणले. फिरून फिरून पाय थकले.  विसाव्यासाठी मी एका पायरीवर बसतो-न-बसतो, तोच आतडं पिळवटून टाकणारा एक हुंदका माझ्या कानी पडतो. मला  राहवतं नाही! त्या दु:खाच्या दिशेनं मी पुढं जातो.

एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्माल्याच्या भल्यामोठ्या ढिगाआड एक वृद्ध गुडघ्यात मन घालून स्फुंदत असलेला दिसतो. पाठीवरून हात फिरवीत मी त्याला विचारतो. 
"आजोबा, तुमचं नाव काय?"
मान वर न करता कापऱ्या स्वरात तो उत्तरतो, 
'परमेश्वर'..
मी मनात चरकतो. वाटतं का वृद्ध बहुधा वेद असावा! 
मी भीत-भीत विचारतो,
"इतकं कसलं दु:ख झालंय तुम्हाला?" 
मान वर करून अश्रू पुशीत वृद्ध उद्धारतो,
'माझ्या एकुलत्या एका मुलानं मला फसवीलं - माझा गळा कापला! किती उमेदीनं, किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला! पण - '
मी उत्सुकतेनं प्रश्न करतो,
"तुमच्या मुलाचं नाव काय?"
दीर्घ सुस्कारा सोडीत वृद्ध उद्धारतो,
'मनुष्य!'

वसूचे डॉक्टर मला भेटायला आले, तेव्हा हा भास नाहीसा झाला- मन अधिक अस्वस्थ करून! बुद्ध, ख्रिस्त, गांधी, श्र्वायत्झर, विवेकानंद - अगणित नावं आठवली. किती संतानी, किती महात्म्यांनी, किती देवमाणसांनी, किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील, पण ते अजून वाहत आहेत - सारखे वाहतच आहेत. 

हे असेच चालायचं? युगामागुन युगं आली आणि गेली तरी? परमेश्वराला सतत रडायला लावणारे, आणि त्याची आसवं पुसण्यासाठी धडपडणारे, या दोन जाती जगात सदैव असाव्यात, असाच सृष्टीचा संकेत आहे काय? 

6 comments: