Saturday, July 2, 2011

ययाती

लेखक : वि. स. खांडेकर

काही गोष्टी घडण्यासाठी योग असावे लागतात हेच खरं नाहीतर मी आतापर्यंत 'ययाती' न वाचण्याला काही कारणंच नव्हत. शाळेतल्या अगदी सातवी-आठवी पासून मी 'ययाती' चं कौतुक आलो होतो. पन्नाशीच्या दशकात प्रसिद्ध झालेली हि कादंबरी आजही सर्वांच्या मुखी आहे, ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा १९७४ साली मिळाला आहे. दर वेळेस मराठी साहित्यावर चर्चा करताना तू ययाती वाचलीय का? या प्रश्नाला नाही उत्तर देताना मला लाजचं वाटायची.

शेवटी एकदा अनपेक्षित पणे तो योग आला. उगाच फिरता फिरता अक्षरधारा नजरेस पडल, आणि वेळ घालवायचा म्हणून आत शिरलो. एक-एक पुस्तक चाळत मी ययाती पर्यंत पोहोचोलो. अनायासे पुस्तक हि समोर होतं, वेळही होता, वाचायला घेतलं, पहिल्या एक-दोन पानातच निर्णय झाला, आणि मी ते खरेदी केलं.

'ययाती' हाती घेतल्यावर पुस्तक खाली ठेवणं शक्यच झालं नाही. खांडेकरांच्या साहित्याबद्दल 'पुस्तक खूप चांगल आहे', असे म्हणण वेडेपणाच ठरेल., उत्तुंग हिमालयच तो, त्याचे मी काय कौतुक करणार. कथेच्या ओघात मध्यरात्र झाली तरी ते पुस्तक खाली ठेवाव असे अजिबात वाटले नाही.

पुस्तक निम्म्यावर आला तरी मला मुखपृष्ठावराच्या घोड्याचा अर्थ समजला नव्हता. मी विचार करत होतो इथे घोडा कशासाठी आहे. आणि मग ययातीच्या एका स्वप्नात- स्वागतात खांडेकरांचे ते रूपक समोर आलं.

ययाती वाहवत गेलाय, बरोबर-चूक हे त्याला कळेनास झालंय, आणि या अवस्थेत त्याला स्वप्न पडतं. तो एका रथात बसलाय, रथ एका अरुंद रस्त्यावरून चाललाय, रस्त्याच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसरीकडे खोल दरी. पाच घोडे रथ ओढत आहेत, ते बेधुंध होऊन धावतायेत, आणि त्यांच्या या बेधुंधपणाची ययातीला भीती वाटतीय, आणि ती भीती खरी ठरते, एक घोडा बेभान होऊन दरीकडे पळत सुटतो. ययातीच्या प्रयत्नांना दाद न देता,तो घोडा, रथ आणि स्वत ययाती दरीत पडतात. आणि ययाती खाडकन झोपेतून जागा होतो. मदिरा
आणि मदिराक्षी (खांडेकरांचे शब्द) यात नखशिखांत डुबलेल्या ययातीची मनस्थिती, त्याला वाटणारी भीती, यांना दर्शवणारं हे रूपक अगदी नकळत पणे संयमाचा संदेश देऊन जातं.
असेच अगदी दुसरं स्वागत, ययाती वडिलांना म्रुत्युशय्येवर पाहताना एका विलासी राजपुत्राची आणि मृत्यूची झालेली पहिली नजरानजर...

या आणि अशा अनेक प्रसंगांनी 'ययाती' एक उत्तम कादंबरी म्हणून साहित्याचा विलक्षण अनुभव करून देते.आणि ती उशिरा का होईना पण मी ती वाचली आहे, याचा मला आनंद होतोय!!

No comments:

Post a Comment