Tuesday, August 31, 2010

माझ्या ऑपरेशनची गोष्ट!!

 "एक छोटंसं Operation करून Corn कापून काढावा लागेल", डॉक्टर म्हणाले. 
पायाच्या बोटाला झालेलं हे Corn डॉक्टरांच्या सौम्य उपचारांना दाद देत नव्हते. वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आणि औषधांचा वापर केल्यावर पण "जैसे थे".
म्हणून डॉक्टरांनी आता त्यांचे मुख्य अस्त्र उपसले होतं - Operation
आणि मी होतो त्यांचा "Subject"

"याला काही तरी खायला घाला आणि अर्ध्या तासात हॉस्पिटल मध्ये परत या" डॉक्टर आईला म्हणाले.
बाहेर आल्यावर माझा पहिला प्रश्न  - "या आधी माझे कोणते Operation झाले आहे का?"
आई - "नाही"
मी - "कधीच नाही? "
"उगाच फालतू प्रश्न विचारू नको, काय गम्मत म्हणून करतात काय Operation?"


व!! तर डॉक्टर पहिल्यांदाच कात्री फिरवणार तर!! (नाही म्हणाले तर, न्हावी तसा दर १५-२० दिवसातून फिरवत असतो) - पण डॉक्टरांची मात्र पहिलीच वेळ!!
उगाच कुठे तरी, पायाच्या एका बोटाला, तेही टोकाला छोटीशी जखम आणि त्यावर काय तर म्हणे Operation - मला भीती वाटायच्या ऐवजी गम्मत वाटत होती.

तासाभरान जेवण आटोपून हॉस्पिटल मध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी मला Operation theatre मध्ये जाऊन झोपायला सांगितले. या आधी Operation theatre मध्ये जाणारी माणसे म्हणजे आजारी, चालता न येणारी असा समज सिनेमा बघून झालेला -  त्या तुलनेत मी मात्र जसा सिनेमा theatre मध्ये चाललोय तशा थाटात गेलो, आणि तिथे जाऊन झोपलो. तिथल्या नर्सनी तो मोठा दिवा बरोबर माझ्या पायावर प्रकाश पडेल असा ठेवला. डॉक्टर आले आणि एक-एक सूचना सांगायला लागले,
ते म्हणाले
"तुला local anesthesia देणार आहे, म्हणजे तुला काही दुखणार नाही, पण त्यासाठी पायाला injection द्यावे लागेल"
"बर" मी म्हणालो.
त्यांनी ते injection घेतल आणि टेबलाजवळ आले, माझं लक्ष त्या injection कडे, डॉक्टरांना बहुधा मला ते बघू द्यायचं नव्हते, त्यांनी नर्सला कानात काहीतरी सांगितले, नर्सने येऊन माझ्या डोक्याखाली टेबलाचे काहीतरी हलवलं आणि टेबल माझ्यासकट कंबरेतून वाकला. आता माझे पाय जमिनीला समांतर होते, पण पोटापासून वर डोक्यापर्यंत मी खालच्या बाजूला झुकलो होतो. मी कितीही डोळे फिरवले तरी मला फक्त पायाचा अंगठा दिसत होता. तरीही डॉक्टरांचं समाधान झाले नाही, त्यांनी कुठलीशी पट्टी आणली आणि माझे डोळे झाकले. आता मिटलेल्या डोळ्यांनी मला हा डॉक्टरांचा पराक्रम कसा दिसणार?


मी विचारले " डॉक्टर, पट्टी गरजेची आहे का?"
"अरे, १५-२० मिनिटाचे काम आहे, मोठे श्वास घे पाहू"
आणि मी श्वास घ्याच्या आतच त्यांनी सुई टोचली सुद्धा!! थोडसं दुखले, पण अगदीच किरकोळ.
आवाज वाढला, बहुतेक डॉक्टरांनी त्यांचे हत्यार घेतल होतं. नर्सन पाय पकडला आणि बहुधा डॉक्टरांनी मुख्य 'घाव' घातला असावा. Anesthesia (भूल) मुळे मला काही जाणवत नव्हतं, पण बहुधा बरंच रक्त आले असावे, कारण नर्सनी विचारलं
"डॉक्टर, पायात blood supply जास्त असतो का?",
डॉक्टर - "नाही, मेंदूत आणि चेहऱ्यात जास्त असतो,"
आणि मग त्यांनी मला विचारलं "नचिकेत, दुखतंय का?"
मी म्हणालो "नाही"
आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला "पट्टी काढू का?"
डॉक्टर उत्तरले "किती रे घाई, थांब जरा"
नंतर बहुधा पुढची ५-१० मिनिटं वेगवेगळी औषधं त्यांनी लावली असावीत, शेवटी मात्र एक bandage बांधल्याच मला जाणवलं.
आणि मग ते म्हणले " काढ आता पट्टी"
डोळे उघडल्यावर बोटाला bandage तयार, काय केलंय ते कळायला काही मार्गच नाही, बंद डोळ्यांनी जे बघितलं(?) तेवढेच.
आता bandage खाली सर्व झाकलेलं. मग मला तसंच १५-२० पडायला सांगून डॉक्टर गेले. वीसएक मिनिटांनी परत येऊन म्हणाले, " आता हळूहळू भूल उतरेल, तेव्हा कदाचित पाय दुखणे चालू होईल, तू जास्त धावपळ करू नकोस, हळू हळू उतर खाली, मी आईला सर्व सांगितलंय, तू आता घरी जाऊ शकतो."

आज्ञेप्रमाणे मी खाली उतरलो, आणि लंगडत लंगडत बाहेर आलो.
आणि आता पुढचा एक आठवडा तरी माझी हि लंगडी चालू राहणार आहे.  
इति Operation गोष्ट 

1 comment:

  1. Very well written. Was smiling throughout :) Anyways, how is your foot now ?

    ReplyDelete